बक्षीस वितरण समारंभ - २०२६
विक्रमी उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था, पिंपरी चिंचवड महानगर आयोजित गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात तुडुंब भरलेल्या संस्कृती लॉन्स मंगल कार्यालय, नवी सांगवी येथे दिमाखात पार पडला. तब्बल १६०० पेक्षा अधिक समाज बांधवांच्या विक्रमी उपस्थितीत बालवाटिकेपासून पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या ७०० गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती चिंचवड विधानसभेचे आमदार माननीय शंकरभाऊ जगताप यांची लाभली. प्रमुख वक्ते म्हणून पीसीसीओई कॉलेजचे प्लेसमेंट अधिकारी प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे तसेच जिल्हा परिषद जांभे येथील प्राथमिक शिक्षिका व सुप्रसिद्ध शिंदे मॅडम युट्युब चॅनेलच्या संचालिका सौ. सीमा शिंदे मॅडम उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. नितीन रंगनाथ देव आणि ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत नुकतीच उपनिबंधकपदी नियुक्ती झालेले श्री. तेजस संजय अमृतकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आपल्या मार्गदर्शनात वाणी समाजाची इतर सर्व समाजघटकांशी जोडलेली नाळ आणि तिचे महत्त्व विशद करताना पिंपरी चिंचवडमधील संघटित समाजाचे कौतुक केले. हे संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेतलेले संस्थेचे विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष व संस्थापक शहराध्यक्ष श्री. सुरेश बापू शिरुडे यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा विशेष उल्लेख करून, त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर प्रबोधन संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे राष्ट्रीय कार्यवाह प्रा. डॉ. दीपक येवले यांचाही नियुक्तीबद्दल शहराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात ७०० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे आणि सौ. सीमा शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अमृतकर फायनान्शियलचे श्री. सी. के. अमृतकर व राधे ग्रुपचे नितीन रंगनाथ देव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमातील सर्वात लक्षवेधी भाग ठरला तो बालचमूंचा प्रबोधनात्मक सादरीकरणाचा कार्यक्रम. विद्यार्थ्यांमधील वाढती स्पर्धा, अभ्यासाचे दडपण, मुलांचा हट्टीपणा, पालकांची भूमिका, हरवलेली मैत्री आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली हरवत चाललेले बालपण अशा अनेक गंभीर आणि संवेदनशील विषयांवर बालचमूंनी अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे अंतर्मुख होऊन प्रबोधन केले. अनेक क्षण स्तब्ध करणारे ठरले, तर अनेक पालकांचे डोळे पाणावले. या संवादाचे लेखन सौ. सविता नावरकर यांनी केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवड शहराचे समाजाध्यक्ष श्री. सुभाषभाऊ अमृतकर यांनी भूषवले. यावेळी महिला अध्यक्षा सौ. सविता नावरकर आणि युवा अध्यक्ष श्री. सौरभ शिरुडे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रबोधन संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र मालपुरे, युवा अध्यक्ष श्री. प्रशांत ब्राह्मणकर आणि महिला कार्याध्यक्षा सौ. सुनिता ताई वाणी यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महाराष्ट्र प्रदेश कार्यवाह श्री. भूषण सोंजे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विभागप्रमुख, कार्यकारणी सदस्य, महिला आघाडी, युवा आघाडी तसेच असंख्य समाज बांधवांच्या अथक परिश्रमातून आणि उत्स्फूर्त सहभागातून हा भव्य सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्वेता भोकरे आणि डॉ. सौ. मीनल येवले यांनी केले, तर श्री. शरद शेवाळकर यांनी आभार प्रदर्शन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, पालकांचे प्रबोधन आणि समाजाचे संघटन या त्रिसूत्रीचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा पिंपरी चिंचवडच्या वाणी समाजाच्या सामाजिक एकजुटीचे आणि सकारात्मक वाटचालीचे प्रभावी दर्शन घडवणारा ठरला.