प्राचीनकाळी थोर योद्धा पृथ्वीराज चव्हाण राजाच्या पदरी चंदा भाट उर्फ चंद वरदायी नावाचा साधारण १३ व्या शतकात श्रेष्ठ असा लेखक, राजकवी तसेच विचारवंत होता. त्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 'पृथ्वीराज रासो' नावाचा काव्यग्रंथ लिहिला आहे. त्यात तो म्हणतो, "गड तो चितोड का, बाकी सब गढैया". अशा या कलाकुसरीने उत्तम अशा चितोडगडमध्ये आपले पूर्वज सावकार, महाजन, माहेश्वरी, श्रेष्ठ अशा पदाने व नावाने नांदत होते.

त्यात आपले पूर्वज सर परशराम तेथील जमीन-जुमल्याची देखभाल करत असत. स्वतः त्यांची हजारो चाहूरांची जमीन होती (चार बिघे म्हणजे एक चाहूर). या जमिनीतील लाकूड, गवत, वाळू व चुनखडीचा लिलाव करून जनतेला देत असत. त्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब करून १/४ (एक चतुर्थांश) भाग राजाला, उरलेल्या ३/4 (तीन चतुर्थांश) भागात खर्च वजा जाता शिल्लक पैसा स्वतःकडे ठेवत. काही काळानंतर तिथल्या राजे लोकांनी आम्हास १/३ (एक तृतीयांश) भाग द्यावा व तुम्ही २/३ (दोन तृतीयांश) भाग ठेवावा अशी परशरामजींकडे मागणी केली. परशरामजींना मात्र ते अमान्य होतं. त्यांनी तातडीने आपल्या समाजाच्या सातही गोत्रांची बैठक बोलावली व सांगितले की, आपण वैश्यवाणी असून हाडाचे व्यापारी आहोत. लाथ मारू तिथे पाणी काढू! यांची आपल्याला गरज नाही; चितोड सोडावे लागले तरी चालेल. आणि शेवटी एकमुखाने निर्णय होऊन आहे ती सगळी स्थावर मालमत्ता सोडून ५०० बैलगाड्या, २०० उंट, १००० गाई व १२०० बैल घेऊन हा लवाजमा मारवाडला आला.

उपजीविकेसाठी जिरे, हळद, धने तसेच इसबगोल सारख्या वस्तू जवळच असलेल्या गुजरात, काठेवाड नंतर मुंबई, महाराष्ट्र येथे विक्री करू लागला. मुंबईवरून परत येताना मुलुंड, भाईंदर वगैरे ठिकाणाहून मीठ खरेदी करून विकत विकत मारवाडला यावे असा व्यापारक्रम चालू ठेवला.

नंतर काही कुटुंबं गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या त्यावेळच्या गोपवाडी नावाच्या गावी स्थलांतरित झाली. तिथे बराच काळ वास्तव्य केलं. त्यात सर परशराम महाजन पण होते. परशराम यांच्या घरी एक दिव्य बालक जन्माला आलं. हे बालक मोठं झाल्यावर लाडोरामजी या नावाने जनमानसात प्रसिद्ध झालं. राग, द्वेष, लोभ, मत्सर नसणारा असा एक महापुरुष अशी त्यांची ख्याती झाली.

पुढे जाऊन या महापुरुषाने समाधी घेतली. त्यांना मानणाऱ्या, त्यांच्या अनुयायांनी त्यांची पुण्यतिथी साजरी करणे, भंडारा करणे असे उपक्रम राबवले. काही दानशूर व्यक्तींनी त्यांच्या नावाने ५० बिघे जमीन इनाम म्हणून दिली. तिथे पायऱ्या असलेली एक बावडी म्हणजे विहीर खोदली.

लाडोरामजी यांची महती सर्वदूर पसरली होती. त्यांच्या अनुयायांना "संत लाडोरामजी यांच्या शाखेतील हे लोक आहेत अथवा समाजाचे आहेत" असे लोक संबोधू लागले. म्हणून लाडोरामजी शाखेतील हा 'लाडशाखीय' अथवा 'लाडवाणी' म्हणून आपण प्रचलित झालो.

गोपवाडी महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्रात आपले मोठ्या प्रमाणात दळणवळण सुरू झाले. साधारण १६२१ मध्ये गोपवाडीहून गांधली-पिंपळोद मार्गे अमळगाव, नंतर नगर-देवळा, शिरूड, दोंडाईचा या ठिकाणी आपले वास्तव्य सुरू झाले. सोनगीर, कळवण, जायखेडा, मुल्हेर येथे आपला समाज स्थायिक झाला आणि हळूहळू खानदेशभर पसरला.

व्यापारामुळे मग ती सावकारी असो वा किराणा माल विक्री, आपण प्रामाणिक व सचोटीपणाने करत गेलो. यातूनच लोक आपल्याला व्यापारातील 'श्रेष्ठ' लोक म्हणू लागले. असं म्हणतात की 'श्रेष्ठ' या शब्दाचा अपभ्रंश 'शेठ' आहे. लोक आपल्याला शेठ म्हणू लागले. स्वतःच्या प्रामाणिकपणावर विश्वास असल्यानेच आपण राजस्थानमधील आपली स्थावर मालमत्ता सोडून सुद्धा एकजुटीने स्थलांतरित होऊन पुनर्प्रस्थापित झालो.

आज अभिमानाने सांगावेसे वाटते की, आपला लाडशाखीय वाणी समाज विविध क्षेत्रात अव्वल ठरत आहे. मग ते बांधकाम असो, आरोग्य असो, शैक्षणिक, सामाजिक, सार्वजनिक वा राजकीय. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण आपला ठसा उमटवित आहोत.

आजची आपल्या समाजातील तरुण पिढी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहे, तिथे स्थायिक होत आहे, स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभा करीत आहे. नुसता महाराष्ट्रच नाही, तर भारतभर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजत आहे. साता समुद्रापलीकडे अगदी नासा (NASA) पर्यंत आपली मजल गेली आहे. सैन्यदल, वायुदल व नौदल सुद्धा आपण काबीज केले आहे.

परमेश्वराला एकच मागणं— समाजाची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, समाजाचं कल्याण होऊ दे आणि या भारतमातेची आमच्या हातून सेवा घडू दे. चला तर, सगळ्यांनी एकमुखाने म्हणूया—

"प्रबोधन पर्व, आपण सर्व!"